पुणे : गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव भडकल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, साखरेच्या दराला लगाम बसला असून, ते सोमवारी उतरणीला लागले. पुण्यातील किरकोळ बाजारात ६९ रुपयांपर्यंत गेलेली साखर सोमवारी ६३ रुपयांवर आली.
केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे दर नियंत्रणात आले, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखर कारखान्यांकडील उपलब्ध साठ्याची प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली आहे. साखरेच्या एकूण खपापैकी ६५ टक्के वापर करणाऱ्या सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किटे, चॉकलेट व आईस्क्रीम उत्पादकांसारख्या औद्योगिक खरेदीदारांवरही साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. साठेबाजी रोखण्यासाठी विशेष भरारी पथके स्थापन करून व्यापाऱ्यांच्या गोदामांची थेट तपासणी केली जात आहे.
‘साखरेतील तात्पुरती तेजी ओसरली असून, भाव नियंत्रणात येत आहेत. किरकोळ बाजारात सध्याच्या ६३ रुपयांच्या पातळीवरच ते स्थिर राहतील,’ असा अंदाज साखर व्यापारी ईश्वर नहार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यास कसर भरून निघेल, असा विश्वास वेस्टर्न महाराष्ट्र शुगर मिल असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केला. साखरेचे भाव प्रथमच क्विंटलला सात हजार रुपयांवर गेले. त्यानंतर तीन दिवसांत तेजीला लगाम बसून भाव सोमवारी साडेपाच हजार रुपयांवर स्थिर झाला. तो पाच हजार रुपयांपर्यंत खाली येणे अपेक्षित असल्याचे काही कारखानदारांनी सांगितले.


