अहिल्यानगर मध्ये शाळा सुटल्यानंतर शिक्षकाच्या कारने सहा विद्यार्थ्यांना चिरडले ;पालकांत संताप

शाळा सुटल्यानंतर रस्त्याने घरी जाणार्‍या सहा विद्यार्थ्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जिल्हा परिषद शाळेचे सहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरसगाव-ब्राम्हणगाव रोडवर ही गुरूवारी घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनाने भेट दिली असून परिसराची पहाणी केली. गुरूवारी सायंकाळी ब्राह्मणगाव वेताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्याने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी माळेवाडीकडून श्रीरामपूरकडे जाणार्‍या माळेवाडी येथील हायस्कूलच्या एका शिक्षकाच्या स्विफ्ट डिझायर कारने जिल्हा परिषदेच्या ब्राम्हणगाव शाळेपासून काही अंतरावर जाणार्‍या विद्यार्थ्यांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, काही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांसह सर्व जखमींना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात केशव आकाश बर्डे (वय 6), आकांक्षा आकाश बर्डे (वय 9), वैभव अमोल बर्डे (वय 6), प्रीती अमोल बर्डे (वय 8), प्रांजल बाळासाहेब तोरणे (वय 7) आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे (वय 12) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील केशव आकाश बर्डे आणि वैभव अमोल बर्डे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, श्रीरामपूर बाजार समितीचे माजी संचालक राधाकृष्ण आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्यात सहभाग घेतला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांनी रुग्णवाहिका तसेच रुग्णालयाशी समन्वय साधला. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि चालकाची जबाबदारी याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून या शिक्षकाने या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते. मात्र अशा प्रकारे आरोपीला सवलत दिली तर भविष्यात पैसे देऊन सर्व गुन्हे माफ होतात असा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अपघाताचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर वाढणारी वाहतूक आणि वाहनांचा वेग लक्षात घेता, शाळांच्या परिसरात वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण, आवश्यक ठिकाणी गतिरोधक तसेच पोलीस बंदोबस्ताची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles