सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर वाचा

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड करणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीला आता लगाम लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली असून, ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले साखरेचे दर आता सुमारे ४८ रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे साखरेच्या बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. साखरेचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साखरेच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, दरात झालेल्या घसरणीमुळे राज्यात तसेच देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय साखर संघानेही साखरेची उपलब्धता पुरेशी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर साखर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील साखर कारखाने, घाऊक व्यापारी, वितरक तसेच मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर करणारे औद्योगिक ग्राहक यांच्या साठ्याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेद्वारे संबंधितांकडे प्रत्यक्षात किती साखर उपलब्ध आहे, साठा नियमानुसार ठेवण्यात आला आहे का आणि बाजारातील दरवाढीमागे कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारातील हालचालींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. साखरेच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चावर त्याचा परिणाम झाला होता. मात्र, आता घाऊक बाजारातील दर खाली आल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येण्याची शक्यता आहे. साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असताना दरात झालेली अचानक वाढ नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचीही चर्चा सुरू आहे. विशेष साठा तपासणी मोहिमेनंतर बाजारातील दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles