राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी २० मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आधी छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांच्यावर देखील त्यांनी टीका केली होती. तसेच थेट पक्ष सोडण्याचे संकेत देखील दिले होते. पण अखेर छगन भुजबळ यांना मंत्रिपद देत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं.
दरम्यान, आता छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ‘भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न विचारता छगन भुजबळ यांना मंत्री केलं आहे’, असं खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“अजित पवार यांचा भाजपाबरोबर अपमान सुरू आहे, म्हणजे अजित पवार यांना न विचारता त्यांच्याच पक्षातील (राष्ट्रवादी काँग्रेस) नेते छगन भुजबळ यांना भारतीय जनता पक्षाने मंत्री केलं. त्यामुळे अजित पवार यांना झोप देखील लागत नसेल. अजित पवार ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्या पक्षाच्या एका नेत्याला (छगन भुजबळ यांना) मंत्री करण्याचे आदेश दिल्लीतून येतात. मग अशावेळी काय करायचं? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांबाबत देखील दिल्लीतून आदेश येतील, काही लोक त्या प्रयत्नात देखील आहेत”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.


