अहिल्यानगर -विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असली, तरी अद्याप एकाही इच्छुकाने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. बुधवारी (27 मे) विविध इच्छुकांच्या समर्थकांकडून 10 अर्जांची खरेदी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 19 इच्छुकांनी 32 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज श्रीगोंद्याचे सचिन गायकवाड यांनी घेतले. त्यामुळे काँग्रेसकडून ससाणे यांची उमेदवारी निश्चित होते का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे बंधू तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप हे आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या नावासाठी नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे तीन अर्ज घेतले आहेत. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे.
याचबरोबर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्यासाठी केडगावचे अनुप काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज खरेदी केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून असून, सोमवार (25 मे) पासून अर्जविक्रीला सुरूवात झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत 13 इच्छुकांनी 22 अर्ज घेतले होते. त्यानंतर बुधवारी आणखी सहा जणांनी 10 अर्ज घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत महायुतीचे पारडे सध्या जड मानले जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपकडे 207 मतदारांचे संख्याबळ आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे 60, तर शिवसेना शिंदे गटाकडे 47 मतदार आहेत. अशाप्रकारे महायुतीच्या प्रमुख पक्षांचे एकत्रित संख्याबळ 310 च्या पुढे जात आहे. एकूण 461 मतदार असलेल्या या मतदारसंघात हे संख्याबळ निर्णायक मानले जात आहे.
महाविकास आघाडीच्या गोटात मात्र सध्या तुलनेने शांतता दिसून येत आहे. निवडणुकीत विजयासाठी आवश्यक आकडे जुळविण्याबाबत अनिश्चितता असल्याचे बोलले जात आहे. तरीही करण ससाणे यांनी अर्ज घेतल्याने ते प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.


