फेसबुक जाहिरात डाउनलोड करताच खाते रिकामे;नगरमध्ये सेवानिवृत्त महिलेची 21 हजारांची फसवणूक
अहिल्यानगर, : फेसबुकवरील बनावट जाहिरातीच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘येनो अॅप’ सुरू करून देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त महिलेची 21 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी (12 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे घडले प्रकरण
दूधसागर सोसायटी, केडगाव येथे राहणाऱ्या 69 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी 7 मे 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सावेडी परिसरातील नोबेल हॉस्पिटलसमोर असताना त्यांच्या मोबाईलवरील फेसबुक अॅपमध्ये ‘येनो अॅप सुरू करून देतो’ अशी जाहिरात दिसली.
संबंधित जाहिरात डाउनलोड केल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला बँकेशी संबंधित असल्याचे भासवले. आरोपीने ‘येनो अॅप’ सुरू करून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून व्हॉट्सअॅपद्वारे बँक खात्याची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक मुख्य शाखेतील खाते तसेच सावेडी शाखेतील खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय एकूण 21 हजार रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यान, आपल्या खात्यातून रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शुक्रवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार अनिता मर्भळ करीत आहेत.


