अहिल्यानगर,: तालुक्यातील पोखर्डी-पिंपळगाव उज्जैनी मार्गावर भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाळू नारायण गाडेकर (रा. श्रीरामनगर, पिंपळगाव उज्जैनी रस्ता, पोखर्डी, ता. अहिल्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अपघाताची माहिती
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव भाऊसाहेब जाधव (रा. पिंपळगाव उज्जैनी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. शुभम शिवाजी जाधव (वय 22, रा. पोखर्डी) यांनी गुरुवारी (11 जून) फिर्याद दिली आहे.
बुधवारी (10 जून) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोखर्डी ते पिंपळगाव उज्जैनी जाणाऱ्या रस्त्यावर मुसेवस्ती परिसरात हा अपघात झाला. महादेव जाधव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने समोरून येणारे बाळू गाडेकर यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बाळू गाडेकर गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला.
चालकाविरुद्ध आरोप
अपघात घडल्यानंतर चालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


