अहिल्यानगर – शेतात मंजूर झालेला सौर कृषी पंप नामंजूर होवू शकतो त्याची मंजुरी कायम ठेवण्यासाठी आणि तो बसवून देण्यासाठी २ हजार ५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना महावितरणच्या बाह्यस्त्रोत वायरमनला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र दादासाहेब कराळे (वय ४१, नेमणूक म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित करंजी कक्ष, ता.पाथर्डी) असे या वायरमनचे नाव असून त्याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप मंजूर झाला आहे. त्यानंतर तक्रारदार यांच्या गावाकरिता नेमून दिलेले कराळे वायरमन हे सौर कृषी पंप बसविण्याच्या ठिकाणी तक्रारदार यांचे शेतामध्ये आले व त्यांनी आल्यानंतर जागेची पाहणी केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो काढले व तक्रारदार यांना म्हणाले की, सौर कृषी पंपा चे ठिकाणी लाईटचा पोल आहे त्याकरिता तुमचा सौर कृषी पंप चा अर्ज नामंजूर होऊ शकतो. त्यामुळे सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास ४ हजार रुपये द्या असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.
त्यावेळी कराळे वायरमन हे सौर कृषी पंपाचा अर्ज नामंजूर करण्याची धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी नाईलाजास्तव त्यांना दोन हजार रुपये दिले होते. त्यानंतर कराळे वायरमन यांनी तक्रारदार यांना उरलेले २ हजार रुपये सौर कृषी पंप बसवल्यानंतर दे असे सांगितले व सर्वे पूर्ण करून शेतातून निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांचे शेतामध्ये सौर कृषी पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले. कराळे वायरमन हे तक्रारदार यांचे शेतात कृषी सौर पंप बसविण्याच्या ठिकाणी सर्वे पूर्ण केल्याच्या मोबदल्यात २ हजार रुपये तसेच तक्रारदार यांचे राहते घराचे वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी ५०० रुपये असे एकूण २५०० रुपये लाच मागणी करत असले बाबतची तक्रार ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीप्रमाणे १७ ऑगस्ट रोजी आरोपी राजेंद्र दादासाहेब कराळे यांचे विरुद्ध लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी कराळे यांनी तक्रारदार यांचे शेतात कृषी सौर पंप बसविण्याच्या ठिकाणी सर्वे पूर्ण केल्याच्या मोबदल्यात २ हजार रुपये तसेच तक्रारदार यांचे राहते घराचे वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी ५०० रुपये असे एकूण २५०० रुपये लाचेची मागणी पंचांच्या समक्ष करून लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी राजेंद्र कराळे यांनी तक्रारदार यांचे कडून स्वतः २५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगरचे पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पो. ना. उमेश मोरे, पो. ना. चंद्रकांत काळे, पो. कॉ. गजानन गायकवाड, पो. कॉ. शेखर वाघ, चालक पो. हे. कॉ. हारूण शेख यांच्या पथकाने केली आहे.


