अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेत रिझर्व बँकेचे बनावट दाखले ;शिक्षकांचे बेमुदत उपोषण

अहिल्यानगर -जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने तुघलकी निर्णय सभासदांवर लादण्याचा प्रकार चालवलेला आहे. त्या विरोधात शनिवारी शिक्षक सभासदांनी नगरमध्ये बँक प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, रघुनाथ झावरे व सुजित बनकर हे उपोषणाला बसले असून या आंदोलनाला ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, डॉ. संजय कळमकर, आबासाहेब जगताप यांनी पाठींबा देत आंदोलनात सहभाग घेतला आहे. यावेळी शिक्षक बँक प्रशासनाने रिझर्व बँकेचे बनावट दाखल्यांचा आधार घेतला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये मनमानी कारभार सुरु असून रिझर्व बँकेच्या आदेशाचे बनावट दाखले देऊन अनेक निर्णय सभासदांवर लादले जात आहेत. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने व प्रशासनाने वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रस्तावित केलेल्या पोटनियम दुरुस्तीमध्ये रिझर्व बँकेच्या आदेशाचा दाखला सर्व शिक्षक सभासद यांच्यासाठी सार्वजनिक करावा, या मागणीसाठी शनिवारपासून शिक्षक सभासदांनी नगरमध्ये बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बँक प्रशासनाकडून बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद घेण्याचा संस्थेच्या अहिताचा आणि अघोरी प्रकार सुरू आहे. यामुळे होणार्‍या परिणामास बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळच जबाबदार राहणार आहे. बँकेत मागच्या दाराने कंत्राटी कर्मचारी भरले जात आहेत.

बँकेत भरण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांची यादी संचालक मंडळाने उपलब्ध करून द्यावी. सभासदांना सात टक्के कर्ज व्याजदर करू असे सांगणार्‍यांची चार वर्षे प्रत्यक्ष कृतीची सभासद वाट पाहत आहेत. कर्ज व्याजदर सात टक्के करण्याचा निर्णय संचालक मंडळांने तातडीने जाहीर करावा. कर्ज निवारण निधीमध्ये जी नापरतावा ठेव 750 रुपये कापली जात आहे, ती नापरतावा ठेव देखील सातत्याने मागणी करून देखील ती कपात बंद करण्यात आलेली नाही, असा आरोप करत शिक्षक संघप्रणित मंडळाचे अध्यक्ष सुरेश निवडुंगे, बाळासाहेब सालके, राजकुमार साळवे, भास्कर नरसाळे, अविनाश निंभोरे, गोकूळ कहाणे, शरद कोतकर, विनोद देशमुख, बाबासाहेब पवार, चांगदेव ढेपले यांनी उपोषण सुरू केले. सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचे अहिल्यानगर जिल्हा शिक्षक बँकेचे सभागृह सर्वसामान्य शिक्षकांनी वापर करू नये म्हणून कुलूपबंद करण्याचा आदेश देणार्‍या प्रवृत्तींचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचा आरोप राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमित पन्हाळे यांनी केला आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची बहुदा ही शेवटची सभा ठरणार आहे. दिवाळीनंतर जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे डोहाळे लागलेले आहे. यामुळेे 2 ऑगस्टला होणारी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा यंदा गाजणार आहे. बँकेत गुरूमाऊली बापूसाहेब तांबे गटाची सत्ता असून त्यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येणार का? हे आगामी काळात दिसून येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles