अहिल्यानगर-एक सराफ व्यापारी झोपेत असताना एका महिलेने त्यांच्या सोबत फोटो काढले. तसेच व्हिडिओ कॉल करुन त्याचे स्क्रिनशॉट काढले. नंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण गंगाधर उदावंत (वय 47 वर्षे) हे सराफ व्यापारी असुन ते राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहतात. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, किरण उदावंत यांची पत्नी घरात नसल्याने आईची व मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी पहा असे त्यांनी त्यांची नातेवाईक मंदा मैड हिला सांगितले होते. तेव्हा तिने सांगितले की, माझी मुलगी मनिषा हि कामाला येत जाईल. त्यानंतर मनिषा मैड हिच्या भावाचे लग्नासाठी किरण उदावंत हे संगमनेर तालुक्यातील आधी येथे गेले होते.
रात्रीच्या वेळी ते घरात झोपलेले असताना आरोपी मनिषा मैड हिने त्यांच्या सोबत झोपलेल्या अवस्थेत काही फोटो काढले. त्यानंतर ती किरण उदावंत यांना म्हणाली कि, मला तुम्ही आवडता, माझे तुमच्यावर प्रेम आहे. नंतर तीने बऱ्याच वेळा व्हिडिओ कॉल करुन त्याचे स्क्रीनशॉट काढुन ठेवले. तेव्हा किरण उदावंत यांनी विरोध केला असता तिने मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवुन ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिला म्हणाली की, तु एकतर आम्हाला 10 लाख रुपये दे, नाहीतर तु माझी मुलगी मनिषा मैड हिच्याशी लग्न कर. तेव्हा किरण उदावंत यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी दि. 24 जानेवारी 2025 रोजी किरण उदावंत यांच्याकडुन लग्न करण्या बाबत संगमनेर येथे बळजबरीने नोटरी करुन घेतली.
त्यानंतरही उदावंत यांनी लग्नाला विरोध केला असता त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला. नंतर आरोपींनी राहुरी येथील उदावंत यांच्या दुकानात जाऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची मागणी केली.त्यानंतर उदावंत यांनी तिला कधी 5 हजार कधी 10 हजार रुपए फोन पे तर कधी रोख रक्कम देत होते. दि. 9 जुलै 2026 रोजी आरोपी महिला उदावंत यांच्या राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड येथील दुकाना समोर आल्या आणि पुन्हा धमकी देवून 10 लाख रुपये खंडणीची मागणी केली. उदावंत यांनी दि. 15 जुलै 2026 रोजी आरोपी मनिषा मैड हिला खंडणी म्हणुन 2 लाख रुपये दिले. त्यानंतर किरण गंगाधर उदावंत यांनी आरोपी महिलांच्या त्रासाला कंटाळून राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी मनिषा दिलीप मैड व मणियार नामक एक महिला अशा दोन महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


