कलाकेंद्राच्या नावाखाली सव्वा लाखाची फसवणूक
अहिल्यानगर : केडगाव परिसरातील मराठानगर येथे एक फसवणूक आणि चोरीची घटना समोर आली आहे. कलाकेंद्रातील कार्यक्रमासाठी आगाऊ रक्कम घेऊनही कामावर न जाता विश्वासघात केल्याप्रकरणी आणि घरातील कपाटातून रोकड चोरल्याप्रकरणी दोन महिलांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोमल नंदा काळे (वय 27, रा. मराठानगर, भाग्योदय मंगल कार्यालयाजवळ, केडगाव, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पूजा भोसले आणि दिव्या बनसोडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी कोमल काळे यांनी आरोपी पूजा आणि दिव्या यांना कलाकेंद्रातील पाटमध्ये काम करण्यासाठी आगाऊ रक्कम (उचल) म्हणून 1 लाख रुपये रोख दिले होते. मात्र, दोन्ही आरोपी महिलांनी फिर्यादीचा विश्वासघात केला आणि ठरल्याप्रमाणे कलाकेंद्राच्या पाटमध्ये काम न करताच तिथून निघून गेल्या.इतकेच नव्हे तर, घरातून जाताना आरोपींनी कपाटात ठेवलेली 35,000 रुपयांची रोकडही फिर्यादीच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली. एकूण 1 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक आणि चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोमल काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोविंद गोल्हार करत आहेत.


