पुणे- बंगळूरू महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रजजवळील इंदोली- पेरले पुलाजवळ शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. पैशांच्या व्यावसायिक व्यवहारातील वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ रमेश चव्हाण व त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) या दोघांना पोलिसांनी अहिल्यानगरमधून नाट्यमयरीत्या अटक केली.
पैशांच्या हिशोबावरून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात संतोष घोलप हे तरुण गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर कराड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमनाथ चव्हाण व त्याचा साथीदार योगेश दीक्षित यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, जखमी संतोष घोलप याची प्रकृती स्थिर असल्याचे या प्रकरणाचे तपासी अधिकारी तथा उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सांगितले.
महामार्गावर कराड तालुक्यातील इंदोली- पेरले पुलाजवळ झालेल्या प्राणघातक गोळीबार प्रकरणाचा उंब्रज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने छडा लावला आहे. मूळचे मित्र असलेल्या दोन व्यक्तींमध्ये व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वितुष्टाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची ही गंभीर घटना आहे.
मुख्य संशयित आरोपी, कालगावचा सरपंच सोमनाथ चव्हाण आणि जखमी संतोष घोलप हे दोघेही एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात गौण खनिज व्यवसायातील पैशांच्या हिशोबावरून वाद सुरू होता. हाच वाद मिटवण्याच्या बहाण्याने शुक्रवारी मध्यरात्री घोलप यांना इंदोली फाट्याजवळ बोलावण्यात आले. तेथे झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. संतापाच्या भरात सरपंच सोमनाथ चव्हाण याने स्वतःच्या फॉर्च्युनर गाडीतील पिस्तुलातून घोलप यांच्यावर दोन राऊंड फायर केले. गोळ्या मांडीला व पायाला लागल्याने घोलप गंभीर जखमी झाले, तर आरोपी आपल्या महागड्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाले.उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वैज्ञानिक पुरावे गोळा केले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, संशयित आरोपी अहिल्यानगर येथील कायनेटिक चौकातील ‘हॉटेल साई सूर्या’ येथे लपल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्परतेने सापळा रचून अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य आरोपी सोमनाथ चव्हाण व त्याचा साथीदार योगेश दीक्षित या दोघांना नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या.


