नगर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अकाली एक्झिटं मुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अहिल्या नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्रामभैया जगताप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. शहराच्या विकासासाठी पवार यांनी कायम साथ देत निधी दिला. आमदार संग्रामभैया जगताप यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्याशी असलेल्या आपुलकीच्या नात्याला उजाळा दिला. सोशल मीडियावर पोस्ट करत आ. जगताप यांनी म्हटले आहे की,
दादा, घड्याळ तेच होतं पण वेळ चुकली… माझ्यावर नेहमीच लहान भावाप्रमाणे विश्वास दाखवणारा, मोठ्या भावाच्या मायेने पाठीशी उभा राहणारा माझा आधार आज हरपला. तुम्ही फक्त माझे नेते नव्हता, तर राजकारणाच्या पलीकडे माझे हक्काचे माणूस होतात. तुमच्या विचारांनी आणि खंबीर नेतृत्वाने माझ्यासारख्या अनेकांना घडवलं.
अहिल्यानगरवर तुमचं अतोनात प्रेम होतं… अहिल्यानगरची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही नेहमी आग्रही राहिलात. दादा, अहिल्यानगर तुमचा ‘बालेकिल्ला’ म्हणून सदैव अबाधित राहील. तुमच्या आठवणींच्या पाऊलखुणा या मातीत कधीही पुसल्या जाणार नाहीत.
दिलेला वादा पूर्ण करणारे, शब्दाला पक्के असणारे आपले दादा गेले… आदरणीय स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


