अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिला कर्मचार्‍याचा छळ ; पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर-येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्टेनोचे काम पाहणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍याने एका अर्जदाराला हाताला धरून कार्यालयातच कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारा आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हादरवून टाकणारा हा प्रकार अत्यंत गंभीर, संतापजनक व लज्जास्पद आहे.

या प्रकरणी पीडित महिला पोलीस कर्मचार्‍याने मंगळवारी (27 जानेवारी) रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार स्टेनोचे काम पाहणारा पोलीस कर्मचारी दीपक सरोदे व खासगी व्यक्ती भाऊसाहेब शिंदे (रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातच कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍याला शोषण, मानसिक छळ व धमक्यांना सामोरे जावे लागल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फिर्यादी महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर आहेत.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अर्जदार भाऊसाहेब शिंदे हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीसाठी आला असताना त्याला अपर पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले. याच कारणावरून शिंदे याने आक्रमक पवित्रा घेत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला व तुला मी दाखवतो अशी धमकी दिली. यानंतर शिंदे याने फिर्यादीच्या विरोधात डीजी व आयजी कार्यालयात मेल व अर्जांचा सपाटा लावत मानसिक त्रास देण्यास सुरूवात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. विशेष म्हणजे, शिंदे हा वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन फिर्यादीला उद्देशून धमकीवजा भाषा वापरत होता.या प्रकरणात पोलीस कर्मचारी दीपक सरोदे याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दि. 23 जानेवारी रोजी सरोदे याने फिर्यादीला स्टेनो कार्यालयात बोलावून सगळं माझ्या हातात आहे. तुझ्याविरोधातील अर्ज मी थांबवू शकतो किंवा वाढवू शकतो असे म्हणत थेट संबंधाचा प्रस्ताव दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, तक्रार केल्यास माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अजून अर्जदार उभे करेन अशी दादागिरी केल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, दि. 7 जानेवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालयात असताना कार्यालयाच्या आवारातच भाऊसाहेब शिंदे याने फिर्यादीकडे पाहून अश्लील वाक्य वापरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.दीपक सरोदे हा पोलीस कर्मचारी असून त्याची बदली अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेत झाली आहे. मात्र तो स्टेनोचे काम पाहत होता. या पदाचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांना त्रास दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्याचे स्टेनोचे कामकाज काढून घेण्यात आले असून त्याला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. मात्र, गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाल्याने पुढे त्याच्यावर कोणती कठोर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles