मनपा सत्तेच्या चाव्या मविआच्या हाती द्या, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ : महानगर प्रमुख काळे

मनपा सत्तेच्या चाव्या मविआच्या हाती द्या, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ : महानगर प्रमुख काळे

प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या सगळ्याच विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, अनागोंदी सुरू आहे. त्याला सत्ताधाऱ्यांचं अभय आहे. वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी, पे अँड पार्कच्या माध्यमातून जनतेची सुरू असणारी लूट यामुळे नागरिक त्रस्त आहे. पण दबाव तंत्र, आर्थिक प्रलोभन दाखवून मतदारांचा स्वाभिमान विकत घेण्याचा कुटील डाव काही लोक शेवटच्या टप्प्यात आखतील. त्याच्या वसुलीसाठी पुढची पाच वर्ष भ्रष्टाचार करतील. शहर विकासासाठी भ्रष्टाचाराची कीड उखडून फेकावी लागेल. त्यासाठी मनपाच्या सत्तेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती द्या, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.

मध्यवर्ती शहरातील उमेदवारांच्या प्रचार फेरी नंतर मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खा.निलेश लंके, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, उपशहर प्रमुख तथा उमेदवार दिलदार सिंग बीर, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, संपदा म्हस्के, शितल भिंगारदिवे, युवा सेना उपशहर प्रमुख मृणाल भिंगारदिवे, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा आदींसह मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले, या शहरात महालक्ष्मी उद्यान आणि गंगा उद्यान हे केवळ दोनच उद्यान आहेत. सिद्धी बागेची दुरावस्था झाली आहे. पाच लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराच्या प्रत्येक भागात उद्यान असू नये मग तुम्ही इतकी वर्ष काय केलं ? प्रोफेसर चौक ते भिस्तबाग चौक यांनी या शहराला मॉडेल रस्ता म्हणून घोषित केला होता. तीन महिन्यात याचं डांबर गायब झालं. सत्ताधारी जनतेला मूर्ख समजता का ? गेल्या अनेक वर्षांपासून सावेडी नाट्य संकुलाच बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. या जागेचं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं. तर तिथं तळीरामांचा अड्डा आढळून आला. नाट्य कलावंत, रसिक यांची किती वर्ष तुम्ही बोळवण करणार आहात ? इतक्या वर्षांमध्ये शहराची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी महानगरपालिकेच साध एक नाट्यगृह तुम्ही उभारू शकला नाहीत.

काळे पुढे म्हणाले, महापालिकेच्या पैशांतून अभ्यासिका उभारली. साधा पोलीस कॉन्स्टेबल तरी त्या अभ्यासिकेतून घडवू शकलात का ? तहसील कार्यालया समोर मनपा आरोग्य केंद्र आहे. लाखो रुपयांची मशिनरी त्या ठिकाणी जनतेच्या पैशांतून आणली. पण आज ती धुळखात पडून आहे. या शहरात आजही असा एक मोठा वर्ग आहे की ज्यांना खाजगी शाळांच्या फी परवडत नाहीत. मात्र मनपा शाळा यांनी केव्हाच बंद पाडल्या. आम्हाला सत्ता द्या. ई लर्निंग, डिजिटल स्कूल आम्ही उभे करू. मोफत दर्जेदार शिक्षण देऊ. आज साधा सर्दी, खोकला झाला तरी वैद्यकीय उपचारांसाठी हजार दोन हजार रुपयांचा खर्च येतो. आम्ही प्रत्येक परिसरासाठी मोहल्ला क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन यायचं ठरवलं आहे. तुम्ही जायचं. पाच रुपयाचा केस पेपर काढायचा. तिथल्या ओपीडीमध्ये मनपाचे डॉक्टर तुम्हाला मोफत उपचार देतील. औषध सुद्धा मोफत देतील. नागरिकांनी प्रचार केलेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. दिल्लीगेट येथे प्रचाराची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles