अहिल्यानगर नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदाची सूत्रे स्वीकारली

जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. गुन्ह्यांची संख्याही अधिक आहे. त्या तुलनेत पोलीस दलाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. मात्र तरीही उपाययोजना करून आपण जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करू, पोलीस कर्मचाऱ्यांना चांगल्या वर्तणुकीसाठी प्रोत्साहित करू, अशी ग्वाही नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दोन दिवसापूर्वी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर ते आज पत्रकारांशी बोलत होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते.
जिल्ह्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे मोठ्या प्रमाणावर होतात. प्रत्येक तालुक्यात वेगळी आव्हाने आहेत. अपुऱ्या पोलीस मनुष्यबळातून बंदोबस्त पुरवावा लागतो. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट विषयाला प्राधान्य देण्यापेक्षा परिस्थितीनुसार त्वरित कार्यवाही करण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस जनतेच्या सेवेसाठी आहेत. जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे पोलिसांचे कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारी पोलीस ठाण्यांच्या स्तरावरच निकाली काढण्याला प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेण्यात येईल. कोणत्या पोलीस ठाण्याबाबत तक्रारी असतील तर नागरिकांनी संपर्क करावा. त्यांना न्याय मिळवून देऊ असेही, त्यांनी सांगितले.जिल्ह्यात गावठी कट्ट्यांची खरेदी विक्री करणारी मोठी साखळी आहे. मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणले जातात, मात्र त्याच्या उगमस्थानापर्यंत पोलीस पोहोचत नाहीत, याकडे लक्ष वेधले असता मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की, परराज्यात गावठी कट्टे बनवून त्याची महाराष्ट्रात विक्री केली जाते. अशा ठिकाणांचा शोध घेऊन उगम स्थानावर कारवाई केली जाईल. त्यासाठी प्रसंगी विशेष शोध मोहीम राबवली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles