छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बनवण्यात आलेला राजा शिवाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा होती. एक मे रोजी हा चित्रपट देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंय. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट जोरात चालताना दिसतोय. 100 कोटींचा बजेट असणारा मराठी चित्रपट अनेक दिग्गज मराठी व हिंदी कलाकारांच्या भूमिकांनी चर्चेत आहे.
अभिषेक बच्चन,संजय दत्त, सलमान खान, विद्या बालन,फरदीन खान,बोमन इराणी, रितेश देशमुख अशा तगड्या कलाकारांनी चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतलं? याविषयी गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. अनेकांनी कलाकारांच्या मानधनावरून अंदाज बांधायला सुरुवात केली होती. आता खुद्द रितेश देशमुखनेच कलाकारांच्या मानधनाविषयी खुलासा केलाय. अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात निशुल्क काम केलं आहे. कोणीही मानधन घेतलं नाही असं रितेशनं सांगितलं.
रितेश देशमुख म्हणाला ‘ खरं सांगतो तुम्हाला, अभिषेक बच्चन याने चित्रपटात मोफत काम केलं आहे. सलमान खान याने मोफत काम केलं आहे. विद्या बालन, बोमन इराणी यांनी मोफत काम केलंय चित्रपटात.जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी मोफत काम केलं आहे चित्रपटात. ही महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जेव्हा महाराजांचा विषय येतो तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हा चित्रपट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जे मानधनाचे तर्क लावले जात आहेत, ती कृपया लावू नका.आपल्या परीने जे काही होत असेल ते सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. फरदीन खाननेही चित्रपटात मोफत काम केलं आहे. जितके जास्त महाराजांवर चित्रपट निघतील तेवढे चांगलं आहे. वेगवेगळ्या नजरेतून हे चित्रपट लोकांसमोर येतील. यामुळे महाराज समजण्यास आपल्याला उपयोग होईल. ही गोष्ट लहान मुलांनी ही ऐकली आहे आणि आजी आजोबांनी हे ऐकली आहे.त्यामुळे आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना घेऊन हा चित्रपट बघण्यासाठी जावं ” असं रितेश म्हणाला.


