कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व वडाळा बहिरोबा येथील चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका मीना कल्याण मडके (वय 55), निता अशोक डूरे (वय 55) या त्यांचे वडाळा येथील मावसभाऊ अविनाश रामचंद्र काकडे (वय 58), अभिषेक भाऊसाहेब मोटे (वय 38), मोनिका अभिषेक मोटे (वय 32), आराध्या अभिषेक मोटे (वय 13), वेदांत अभिषेक मोटे (वय 3) व सलाबतपूर येथील मनीषा रामदास कोहक (वय 50) हे सर्व नातेवाईक मंगळवार दि. 5 मे रोजी पहाटे वडाळा येथून स्कार्पिओ गाडीने आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मुबंई येथे जात असताना सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पीओ गाडीची धडक झाली.
विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-अहिल्यानगरसाठी निघालेली एसटी बस व स्कार्पिओ गाडीची मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे हद्दीत समोरासमोर जोराची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका मीना कल्याण मडके (वय 55) निता अशोक डूरे (वय 55), वडाळा येथील अविनाश रामचंद्र काकडे (वय 58) व अभिषेक भाऊसाहेब मोटे (वय 38) यांचा मृत्यू झाला असून मोनिका अभिषेक मोटे (वय 32), आराध्या अभिषेक मोटे (वय 13), वेदांत अभिषेक मोटे (वय 3) व सलाबतपूर येथील मनीषा रामदास कोहक (वय 50) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्यात मदत केली. जखमींवर अपघात स्थळानजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चारही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मीना मडके व डूरे यांचा भेंडा येथे तर अभिषेक मोटे व अविनाश काकडे यांच्या पार्थिवावर वडाळाबहिरोबा येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या चार जणांवर काळाने झडप घातल्याने भेंडा व वडाळा बहिरोबा परिसरावर शोककळा पसरली आहे.


