कर्जमुक्ती योजनेत अहिल्यानगर अव्वल; शेतकऱ्यांनो KYC आणि आधार अपडेट ठेवा , १ लाख ९२ हजार २८२ खात्यांची माहिती अपलोड

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयावर भर

जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ खात्यांची माहिती अपलोड

अहिल्यानगर, दि. ८ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार ५९४ पात्र खात्यांपैकी १ लाख ९२ हजार २८२ खात्यांची माहिती प्रणालीवर अपलोड करण्यात आली असून, हे प्रमाण ९९.८४ टक्के इतके आहे. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत, पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी कृषी विभाग, सहकार विभाग आणि बँक यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधला जात आहे.

योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी संबंधित सर्व यंत्रणा कार्यरत असून, शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेबाबत मार्गदर्शन करणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच विविध माध्यमांतून योजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सहकार विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध सहकारी संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत करण्यात येत आहे.

दरम्यान, बँकांकडून कर्ज खात्यांची पडताळणी, नोंदींची शहानिशा तसेच आवश्यक आर्थिक माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते कार्यरत ठेवावे, केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करावी तसेच आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

योजनेबाबत कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित कृषी कार्यालय, सहकार विभाग अथवा कर्ज खाते असलेल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles