Ahilyanagar …..मोबाईल दुरुस्तीच्या नावावर महिलेचे फोटो चोरून ब्लॅकमेल, लैंगिक अत्याचार

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दुकानदाराने मोबाईल दुरुस्तीच्या नावाखाली महिलेच्या मोबाईलमधील खासगी फोटो मिळवून तिला ब्लॅकमेलिंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. संबंधित महिलेने याबाबत लोणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले तसेच तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीरसंबंध केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने फिर्यादीत केला आहे. लोणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी महिलेचा मोबाईल खराब झाल्याने तिने तो लोणी खुर्द येथील एका मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. त्यावेळी तिने दुकान चालकाला मोबाईलचा स्क्रीन पासवर्डही सांगितला होता. मोबाईल दुरुस्त करून परत दिल्यानंतर काही दिवसांनी संबंधित दुकानदाराने महिलेला फोन करून, मोबाईल दुरुस्तीच्या वेळी त्यातील तिचे खासगी फोटो काढून घेतले.

संबंधित दुकानदाराने महिलेला भेटण्यास बोलावून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. मागणी मान्य न केल्यास खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. पीडित महिलेला तो वारंवार फोन करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. जून 2024 मध्ये महिलेला दुचाकीवरून बाभळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केल्याचे पीडित महिलेने सांगितले. त्यावेळी संबंधित व्यक्तीने आक्षेपार्ह फोटो काढून घेतले आणि ते दाखवून पैशांची मागणी करून धमकावत असे.

फोटो व्हायरल करण्याच्या भीतीपोटी पीडित महिलेकडून वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात मिळून सुमारे 50 हजार रुपये सदर व्यक्तीला दिले. त्यानंतरही ब्लॅकमेलिंग सुरूच असल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे. मे 2026 पर्यंत शिर्डी येथील एका हॉटेलमध्येही महिलेला बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर संबंधित दुकानदाराने मोबाईल दुकान दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित केले. तरीही तो वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून पीडित महिलेला संपर्क करून भेटण्यासाठी बोलावत असे.

दरम्यान, 9 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा फोन करून भेटण्यास ये, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मोबाईल दुकानदाराविरुद्ध बीएनएस 64(1), 64(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोबाईल दुरुस्तीच्या वेळी संबंधित महिलेचा खासगी डेटा कशाप्रकारे मिळवण्यात आला, त्याचा गैरवापर झाला का? तसेच अशाच प्रकारे इतर महिलांनाही ब्लॅकमेल केले आहे का? या प्रकरणाची नेमकी सत्यता काय याचा तपास लोणी पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles