नगर : भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेत रुपांतर करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानभवन येथे राज्यातील कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली. या निर्णयामुळे भिंगारकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. आता या भिंगार नगरपरिषदेच्या माध्यमातून भिंगारच्या जनतेची विकासाची मागणी पूर्ण होण्याची सुरुवात होणार आहे. या नवीन नगर परिषदेच्या हद्दीतील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीही उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार आगामी काळात भिंगारमध्ये मूलभुत विकासकामांसह अन्य प्रश्नांची सोडवणूक खा.निलेश लंके यांच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली.
कळमकर यांनी म्हटले आहे की, भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाचा कारभार थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असल्याने भिंगार शहर विकासापासून वंचित राहिले. नवीन बांधकामे, पाणी व इतर मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होत नव्हती. आता या बोर्डाचे नगरपरिषदेत रूपांतर होत आहे. ही भिंगारकरांसाठी आनंदाची बाब आहे. आता या भागात बांधकामावरील निर्बंध हटणार आहे. नगरपरिषदेसाठी स्वतंत्र मुख्याधिकारी नियुक्त होईल. यासह नगरपरिषदेत भिंगारचे लोकनियुक्त नगरसेवक येतील. या माध्यमातून भिंगारच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. बांधकामाची नवी नियमावली मिळकतधारकांना दिलासा देणारी आहे. याशिवाय पाण्यासाठीही स्वतंत्र योजना आणता येणार आहे. यापूर्वी भिंगारचा समावेश अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत होणार अशी चर्चा होती.मात्र स्वतंत्र नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याने भिंगारच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. या परिसराच्या विकासासाठी भिंगारकरांशी संवाद साधून खा.निलेश लंके यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे कळमकर यांनी म्हटल आहे.


