विधान परिषदेच्या उमेदवारी शिवसेनेत शेवटच्या तासांपर्यंत सस्पेन्स कायम राहणार असल्याचं दिसून येत आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून काल 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडी यांच्याकडूनही लढवली जाणाऱ्या एका जागेसाठी उमेदवार जवळपास निश्चित आहे. शिंदेंच्या शिवसेनेत मात्र शेवटपर्यंतचा सस्पेन्स यंदाही पहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची मोठी यादी आहे. अशात ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर मिळालेल्या संधीमुळे प्रस्तापित नेत्यांसोबत इतर नेत्यांनाही आपल्याला संधी मिळू शकते, अशी आशा आहे.दोन जागांपैकी एक जागेवर नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित मानले जात असून मात्र दुसऱ्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. दुसऱ्या जागेसाठी प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांचे नाव चर्चेत होते. मात्र प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट घातली होती. त्यानंतर आज बच्चू कडू मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे बच्चू कडूंच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र शिवसेनेतही दिपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक, शायना एनसी, रविंद्र धंगेकर, शीतल म्हात्रे यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे समोर येत आहे.
बच्चू कडूंच्या ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाला मोठी कलाटणी? काही तासांत होणार फैसला!
आज दुपारी १२ वाजता बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या निर्णयाचे पडसाद आगामी विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडू यांना शिवसेनेकडून एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. प्रहार पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व संपवून तो पूर्णपणे शिवसेनेत विलीन करावा, अशी ही अट असल्याचे बोललं जात आहे. जर हा निर्णय झाला, तर अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहेत.


