राज्याचे दिवंगत नेते अजित पवारांची जयंती आता सर्व शासकीय कार्यालयात साजरी होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश आता शासकीय स्तरावरील अधिकृत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या यादीत करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने 15 जुलै, 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून, दादांच्या महाराष्ट्राच्या विकासातील अभूतपूर्व योगदानाचा हा मोठा सन्मान मानला जात आहे. स्व. अजितदादा पवार यांची पहिली जयंती 22 जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे.22 जुलै या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना दिली जाईल. हा आदेश राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनाही बंधनकारक करण्यात आला आहे. तेथेही दादांच्या जीवनप्रवासावर आधारित विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदामंत्री यांसारखी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. त्यांची कामाची शिस्त, प्रशासनावरील करडी पकड, पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची अनोखी पद्धत आणि ‘शब्द पाळणारा नेता’ ही त्यांची ख्याती अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे.
त्यांच्या निधनानंतर (28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर) संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. आता त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे दादांच्या लोकसेवेच्या वारशाचा आणि ‘नवा महाराष्ट्र’ घडवण्याच्या त्यांच्या ध्येयाचा शासकीय स्तरावर केलेला सर्वात मोठा सन्मान आहे.


