अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार संग्राम जगताप म्हणाले…

राहुरी विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले १ लाख १२ हजार ५८७ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. इतर सर्व ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गुलाल उधळून जल्लोष केला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यादव यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारले. मंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांचा सत्कार केला. तसेच निवडणूक योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल प्रशासनालाही धन्यवाद दिले.
भाजपचे अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली तर त्यांचे लगतचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली. एकूण ४१२ टपाली मतदान झाले. त्यातील २९ मते बाद झाली. कर्डिले यांना २८३ मते मिळाली.

अक्षय कर्डिले यांच्या विजयाने आपल्याला मोठा आनंद झाला आहे. अशावेळी स्व. शिवाजी कर्डिले यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या दूरदृष्टीने, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या पद्धतीने तसेच सरकारच्या कामगिरीवर राहुरी मतदारसंघातील मतदारांनी शिक्कामोर्तब केले. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा विजय सुकर झाला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस आहे यांना आहे. त्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन निर्णय घेतले. त्याचा परिणाम विजयात झाला, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

विखे यांच्या पालकत्वाच्या भूमिकेमुळे विजय – आमदार जगताप
निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांनी पालकत्वाची भूमिका स्वीकारली. त्यातूनच मतदारांनी मोठा कौल दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. मतदारांनी शिवाजी कर्डिले यांच्या कार्याला पसंती दिली आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles