राहुरीत कर्डिले कुटुंबाचा विजय; अक्षय कर्डिले आमदार, आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू अनावर
अहिल्यानगर
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत राजकीय मैदान गाजवले. या विजयाने कर्डिले कुटुंबीयांमध्ये भावनिक वातावरण पसरले असून मतदारांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे हा विजय अधिकच खास ठरला आहे. विजयानंतर अक्षय कर्डिले यांनी थेट आपल्या वडील दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतिस्थळाला दर्शन घेत अभिवादन केले. वडिलांच्या आठवणींनी भारावलेल्या या क्षणी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. त्यानंतर घरी परतताच कर्डिले कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या त्या त्यांच्या आई अलका कर्डिले यांच्याकडे मुलाच्या विजयाचा आनंद आणि पतीच्या आठवणींचा भावनिक संगम होताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना मिठी मारत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. राहुरीतील मतदारांनी कर्डिले कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवले आहे. या विजयामुळे स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.


