नाशिक: राज्यातील मंत्री व बड्या राजकीय नेत्यांच्या भविष्य कथनाने नावारुपास आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे डोळे दीपवणारी संपत्ती आहे. नाशिक शहरासह सिन्नर, अहिल्यानगरमधील शिर्डी, राहता, निघोज, निमगाव कोऱ्हाळे आदी ठिकाणी शेकडो कोटींचे भूखंड आणि शेत जमिनी त्याच्यासह कुटुंबियांच्या नावे आहेत. खरातने भोंदूगिरीतून मोठी माया जमवली. शहरातील एका जागेत तर ठाण्यातील शासकीय अधिकारी त्याचा भागीदार बनल्याचे दिसून येत आहे.
महिलेचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खरातचा शहरातील बंगला, कार्यालय आणि सिन्नर येथील शेत घराची झाडाझडती घेतली. त्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे, आठ लाखांची रोकड, दोन लॅपटॉप, मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. खरातने स्वतःसह पत्नी कल्पना आणि मुलगी तृप्तबाला खरात तसेच नातेवाईकांच्याही नावांवर अनेक मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. त्यांची किंमत शेकडो कोंटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे.
एकीकडे भोंदुगिरी आणि दुसरीकडे जमिनीच्या खरेदी-विक्री असेही उद्योग तो करत होता. १०० हून अधिक देशांची त्याने सफर केल्याचे सांगितले जाते.
आतापर्यंत खरातच्या मालमत्तेचे ६० हून अधिक सातबारे समोर आले आहेत. संशयित खरातचा शहरातील कर्मयोगीनगर भागात अलिशान बंगला असून महागड्या शरणपूर रोड भागात कार्यालय आहे. खरात कुटुंबियांची मोठी गुंतवणूक महापालिका क्षेत्रातील पाथर्डी, विल्होळी व गौळाणे भागात आहे. या भागात जवळपास १६ भूखंड आणि सहा एकरच्या आसपास शेत जमीन आहे. आडगाव येथेही भूखंड आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे खरातने ईशानेश्वर मंदिर उभारले. मंदिरा शेजारी त्याचे अलिशान शेतघर (फार्म हाऊस) आणि बाजुला विस्तीर्ण क्षेत्रावर आंब्याची बाग आहे. या ठिकाणी त्याची २१ एकर शेतजमीन असून पुढील काळात गावात त्याने आसपासच्या शेत जमिनी खरेदी करण्याचा धडाका लावला. या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या गटात आणखी २५ एकर शेतजमीन मिळवल्याचे ग्रामस्थ सांगतात. सिन्नर शहरात तीन भूखंड व दुकान, कुंदेवाडी येथे शेतजमीन आहे.
नाशिकप्रमाणे लगतच्या अहिल्यानगरमधील शिर्डी, राहता, निघोज, निमगाव कोऱ्हाळे या ठिकाणी शेत जमीन व अनेक भूखंड त्याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील काही जागा कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, पाथर्डी शिवारातील एक एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यात खरातच्या मुलीसोबत सध्या ठाणे येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीचे नाव झळकत आहे. संबंधित अधिकारी पूर्वी बराच काळ नाशिकमध्ये कार्यरत होता. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्याने खरातशी भागीदारी करीत जमीन खरेदी केल्याची चर्चा होत आहे.
भोंदूबाबा अशोक खरातचे नाशिकसह नगर पाथर्डी निघोज ६० सातबारे; उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव रडारवर!
- Advertisement -


