विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विधान परिषद सदस्यपदाची ‘ऑफर’ देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची आज मुंबईत भेट झाली. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बच्चू कडू यांना यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संधी दिली जाईल, असे संकेत मिळाले आहेत. पण, अद्याप बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू हे सरकारविरोधी आंदोलनांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी मोठे आंदोलन केले होते. अखेर सरकारला जून २०२६ पुर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन द्यावे लागले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर महिनाभरापुर्वी भर उन्हात पदयात्रा काढली होती. त्याचीही दखल सरकारला घ्यावी लागली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चिखलदरा येथे पोहचून मेळघाटातील प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केले होते.
शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, आदिवासींच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करणारे, आंदोलनात्मक भूमिका घेणारे बच्चू कडू हे विधान परिषद सदस्यपदाची ‘ऑफर’ स्वीकारणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी बच्चू कडू यांनी त्यांची साथ दिली होती. त्यामुळे कडू यांना टीका देखील सहन करावी लागली होती. पण, बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध राहिले आहेत. यापुर्वी आंदोलनाच्या वेळी मध्यस्थी करण्यासाठी शिंदे गटाचे नेते समोर आल्याचे चित्र दिसले.विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होत असताना पक्षीय बलाबलाचा विचार करता विधानसभेतील सध्याच्या आमदारांच्या संख्येनुसार एका आमदाराला निवडून येण्यासाठी २८ ते २९ मतांच्या कोट्याची गरज भासणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) दोन सदस्य सहज निवडून येऊ शकतात.


