विधान परिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपकडून ३० जणांच्या नावाची यादी केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. यापैकी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब माहिती सूत्रांनी दिली.
भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलेल्या ३० जणांच्या यादीमध्ये प्रज्ञा सातव यांच्यासह माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी यांची नावं असल्याची माहिती आहे. या पैकी आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतोय ते पाहणे महत्वाचे राहिल.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला असलेल्या ६ जागांसाठी कुणाला संधी द्यायची यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. ३० जणांची यादी तयार आहे यामधील कुठली ६ नावं केंद्रीय नेतृत्वाकडून फायनल होणार हे लवकरच कळेल. या निवडणुकीत जातीय आणि प्रादेशिक समतोलावर विशेष भर दिला जाणार आहे.दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील ९ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे.
यामध्ये संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या ९ सदस्यांचा समावेश आहे. तर विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या १० जागांसाठी पुढच्या महिन्यात १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.


