खत वितरणात पारदर्शकता निर्माण व्हावी तसेच शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या परिसरातल्या कृषी सेवा केंद्रात कोणत्या प्रकारच्या खताचा किती साठा शिल्लक आहे, याची माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने ‘ब्लॉगस्पॉट’ नावाची ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. जिल्ह्यात या प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे.
हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी धांदल उडालेली असते. काही व्यापाऱ्यांकडून त्याचा गैरफायदा घेत साठा शिल्लक असूनही खते उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते, लिंकिंग पद्धतीने विक्री केली जाते, अधिक दराने विक्री केली जाते. त्यातून शेतकऱ्यांची अडवणूक होते.
शेतकऱ्यांची अडवणूक थांबण्यासाठी व खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ‘ब्लॉगस्पॉट’ नावाची ऑनलाईन प्रणाली कृषी विभागाने तयार केली आहे. ‘क्यूआर कोड’ पद्धतीने स्कॅन करून किंवा लिंकद्वारे याचा वापर करता येतो.’क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर किंवा ‘लिंक ओपन’ केल्यानंतर जिल्हा, तालुका व कृषी सेवा केंद्रांची यादी दिसते. या केंद्रातून कोणता व किती खातसाठा शिल्लक आहे, याचीही माहिती असते. खताची विक्री ‘पॉज’ यंत्राद्वारे केली जाते. त्यामुळे अद्ययावत साठा नोंदवलेला असतो. ‘ब्लॉगस्पॉट’द्वारे माहिती घेऊन शेतकऱ्यांना आपल्याला हवे ते खत जवळच्या दुकानातून घेणे शक्य होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व परवानाधारक म्हणजे ५ हजारांवर कृषी सेवा केंद्रांची नावे या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. कृषी विभागाकडून आता या ऑनलाइन प्रणालीचा प्रचार व प्रसार सुरू करण्यात आला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामाचे नियोजन व्यवस्थित केल्याने पर्याप्त प्रमाणात युरिया व मागणी असणाऱ्या रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. वितरणात पारदर्शकता असावी यासाठी मोबाईलद्वारे ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून शेतकऱ्यांना आपल्याला हवे ते खत कोणत्या कृषी सेवा केंद्रात उपलब्ध होईल याची माहिती घरबसल्या मिळू शकेल. या संदर्भात काही अडचणी असल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. -सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, अहिल्यानगर.


