नगर-कल्याण रोडवर खळबळ; मध्यरात्री रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, पत्नीवर उपचार सुरू

झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पत्नीवरही जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर,: नगर-कल्याण रोड परिसरातील जाधव मळा भागात अज्ञात इसमाने झोपेत असलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात त्याची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे. लक्ष्मण उर्फ लक्ष्या मार्तंड काळे (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पहाटे 3 वाजता घडली घटना
याबाबत रुपाली लक्ष्मण काळे (वय 28, रा. मुळचे काळेगाव, ता. शेवगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे पती लक्ष्मण काळे हे मुळचे शेवगाव तालुक्यातील असून कामानिमित्त नगर-कल्याण रोडवरील जाधव मळा येथील एका शेडमध्ये वास्तव्यास होते.

दोघे पती-पत्नी झोपेत असताना 16 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने झोपेत असलेल्या लक्ष्मण काळे यांच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. एवढेच नव्हे तर, हल्लेखोराने फिर्यादी रुपाली काळे यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला. रुपाली काळे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, कोतवालीचे पो.नि. नितीन देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट स्कॉडला पाचारण करण्यात आले असून, तपासाला गती देण्यात आली आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला आहे. लक्ष्मण काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होता आणि त्याने हे कृत्य कोणत्या कारणासाठी केले, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पो.नि. नितीन देशमुख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles