कर्जत-तालुक्यातील खुरंगेवाडी येथे वैष्णवी विलास जगधने (वय 17 वर्षे 10 महिने) आणि वैभव भाऊसाहेब शिंगाडे (वय 20 वर्षे) या युवक-युवतीचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती मिरजगाव पोलिसांनी दिली. दोघेही घरातून बेपत्ता होते. कुटुंबीय व नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना 2 सप्टेंबर रोजी सकाळी गावाजवळील बसस्थानकापासून सुमारे 400 मीटर अंतरावरील विहिरीजवळ वैभवची चप्पल आणि वैष्णवीचे दप्तर आढळले.
माहिती मिळताच मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोध घेतला असता वैष्णवीचा मृतदेह आढळला. तिच्या अंगावर शालेय गणवेश होता. मृतदेह मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आला. सायंकाळी त्याच विहिरीत वैभवचाही मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या की अन्य घटना, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


