नगर शहरात हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ;दोन हॉटेलचा व्यवसाय परवाना निलंबित

अहिल्यानगर-बहुचर्चित हॉटेल सगम आणि हॉटेल सत्कार या दोन हॉटेलांचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान दोन्ही हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून राज्यभर ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत हॉटेल, उपहारगृहे, खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापने तसेच इतर अन्न व्यवसायांची नियमित तपासणी सुरू आहे. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी शहरातील स्वस्तिक चौक येथील हॉटेल सगम आणि माळीवाडा परिसरातील हॉटेल सत्कार येथे अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान दोन्ही हॉटेलमध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले.

अन्न तयार करण्याची जागा, स्वच्छतेची व्यवस्था तसेच अन्न सुरक्षा मानकांचे पालन समाधानकारक नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी) नियम, 2011 मधील संबंधित तरतुदींनुसार दोन्ही हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने जारी केले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, परवाना निलंबित असताना संबंधित हॉटेलांनी कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय चालवू नये. आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या आदेशाविरोधात संबंधित हॉटेल चालकांना नियमानुसार अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांच्याकडे अपील करण्याचा अधिकार उपलब्ध आहे.अन्न व औषध प्रशासनाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुढील काळातही जिल्हाभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, मिठाई दुकाने आणि इतर अन्न व्यवसायांची तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles