नगर-मनमाड महामार्गावर एसटी बस व कारची समोरासमोर धडक ; तिघेजण गंभीर जखमी

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरात नगर-मनमाड राज्य महामार्गावर एसटी बस आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 7 जुलै 2026 रोजी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस (क्र. एमएच 14 एलएक्स 9818) ही सिंदखेडा-पुणे मार्गावरील बस असून ती दुपारी सुमारे 3.30 वाजता कोल्हारहून राहुरीकडे येत होती. त्याचवेळी व्हिस्टा कंपनीची चारचाकी (क्र. एमएच 17 एजे 2815) राहुरीहून कोल्हारकडे जात होती. चिंचोली परिसरातील हॉटेल प्रसादजवळ रस्ता खराब असल्याने एसटी बस चुकीच्या बाजूने जात असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. याचवेळी समोरून येणार्‍या चारचाकीशी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात चारचाकीतील राजू शेख, कदीर शेख आणि नजीर गुलाब सय्यद (रा. कानडगाव व ममदापूर) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, हवालदार प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे, अंकुश भोसले तसेच रुग्णवाहिका चालक रविंद्र देवगीरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमींना तातडीने लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातात चारचाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.

अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, एसटी बस चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles