मनपा कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार

अहिल्यानगर-महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत- परदेशी यांच्या निर्घृण हत्येने संतप्त झालेल्या नागरिकांचा आक्रोश सोमवारी रात्री रस्त्यावर पाहायला मिळाला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हत्येच्या कटातील सर्व आरोपींना अटक करावी आणि आरोपींची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत, या मागण्यांसाठी डीएसपी चौकात सुरू करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. त्यानंतर धीरज परदेशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. इन कॅमेरा शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पार्थिव अहिल्यानगरमध्ये आणण्यात आले.

दरम्यान, धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले, संग्राम बापू भंडारे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी डीएसपी चौकात रास्तारोको आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनस्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी उपस्थित आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

मात्र, आंदोलक ठोस आश्वासनावर ठाम होते. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल, तसेच खटला जलदगती न्यायालयापुढे चालविण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे आंदोलकांनी सांगितले. आरोपींची अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हटविण्यात येतील. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासन कठोर पावले उचलेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या आश्वासनानंतर आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले आणि धीरज परदेशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.दरम्यान, धीरज परदेशी हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांचीही चौकशी करण्यात येणार असून, चौकशीत दोष आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles