आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही नेते फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. तर, काही स्वेच्छेने पक्षाला रामराम ठोकत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्यासोबत तब्बल १० नगरसेवकांनीही कमळ हाती घेतलं आहे.अनिल धानोरकर यांच्या भाजप पक्षात पक्षप्रवेशामुळे भद्रावती नगरपालिकेचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भद्रावती पालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व होते. मात्र आता धानोरकर कुटुंबात अधिकृत राजकीय फूट पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अनिल धानोरकरांचा भाजपात प्रवेश
चंद्रपुरात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि भद्रावती नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यांनी आज भाजप पक्षात अधिकृत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्यासोबत १० माजी नगरसेवकांनीही भाजपाची साथ दिली आहे.
अनिल धानोरकर हे सुरुवातीला ठाकरे गटात कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली होती. यानंतर त्यांना शिवसेनेतून निष्कासित करण्यात आलं होतं. दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्यातील कौटुंबिक वादाच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अखेर आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकत अधिकृतपणे भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.


