UPI चा गैरवापर करून सायबर चोरी; काही मिनिटांत 10 लाख लंपास, सायबर पोलिसात गुन्हा दाखल
अहिल्यानगर -शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका अज्ञात भामट्याने तरुणाच्या बँक खात्यांवर डल्ला मारत तब्बल 10 लाख 2 हजार 779 रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुण श्रीराम संजय बांगर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम बांगर हे पाथड तालुक्यातील लोहसर येथील रहिवासी असून ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. गेल्या शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या तीन वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमधून पैसे काढून घेतले. यामध्ये आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यांचा समावेश आहे.
चोराने युपीआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटांत ही सर्व रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली. खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. श्रीराम बांगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


