मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अहिल्यानगर, दि. ७ :- भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता वर्तवत अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा अहिल्यानगर पाटबंधारे विभागाने दिला आहे. धरणातील पाणीसाठा व नदीपात्रातील पाण्याचा आवक लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता व्यक्त केली असून त्यानुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धरणस्थळांच्या खालील प्रवरा नदीकाठच्या गावांतील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासांत पावसाने अक्षरशः तांडव घातले असून, येथे तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने स्थानिक नदी-नाल्यांना पूर आला आहे.
घाटघर आणि रतनवाडी परिसरातील अतिवृष्टीमुळे या दुर्गम आदिवासी भागातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून चोख खबरदारी घेतली जात आहे.


