हद्दपारीचा आदेश धाब्यावर: सोनू बोरुडेला पाथर्डी तालुक्यातुन अटक , गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर, 22 मे 2026: अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार विनापरवाना पुन्हा जिल्ह्यात वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचपुर, ता. पाथर्डी येथून सोनू उर्फ वैभव राजेंद्र बोरुडे, वय 30, याला घरी जाऊन ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये व पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश माळी, सुयोग सुपेकर, रोहित येमुल व सागर ससाणे यांचे पथक हद्दपार आरोपींचा शोध घेत होते.
दि. 21 मे 2026 रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हद्दपार इसम सोनू उर्फ वैभव बोरुडे हा हद्दपार आदेशाचा भंग करून विनापरवाना चिंचपुर येथे घरीच आहे.
माहितीच्या आधारे पथकाने तातडीने चिंचपुर येथे जाऊन सोनू बोरुडेला ताब्यात घेतले. अभिलेख तपासणीत त्याला दि. 05/12/2025 पासून 2 वर्षांकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पो.कॉ. सागर ससाणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले इसम विनापरवाना जिल्ह्यात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील 0241-2416111 किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


