शेताच्या बांधावरून वाद; कुन्हाडीचे वार करून निवृत्त शिक्षकाची हत्या, आरोपी फरार
श्रीगोंदा, तालुक्यातील पिसोरे खांड येथील गावडे मळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12 जून) सकाळी घडली.
जुन्या वादातून हत्या
या घटनेत निवृत्त शिक्षक पोपटराव रावजी गावडे (वय 75) यांचा कुन्हाडीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विलास दादा गावडे याच्याशी शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. त्यावेळी विलास गावडे याने शिवीगाळ व दमदाटी केली.
आरोपी फरार, गुन्हा दाखल
सकाळी नऊच्या सुमारास विलास गावडे हा हातात कुन्हाड घेऊन बांधाजवळ फिरत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. काही वेळानंतर पोपटराव गावडे यांच्या घरासमोरील शेतात आरोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. कुन्हाडीने डोक्यात जोरदार वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीय घटनास्थळी धावून येताच आरोपी तेथून फरार झाला.
जखमी अवस्थेत पोपटराव गावडे यांना तातडीने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. विजय पोपटराव गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास दादा गावडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.


