अहिल्यानगर -शहरातील केडगाव परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने एका कुटुंबाच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित मुलाशी लग्न लावून द्या, अन्यथा तुम्हांला किंवा स्वतःला चाकूने संपवून टाकेन, अशी धमकी देत या तरुणीने संपूर्ण कुटुंबाला घरातच अटकाव केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकामाता कॉलनी येथील पीडित महिलेचा मुलगा आणि संबंधित आरोपी तरुणी यांची ओळख महाविद्यालयात झाली होती. तेव्हापासून ही तरुणी त्या मुलावर एकतर्फी प्रेम करत होती. पीडित कुटुंबाने तिला वारंवार समजावून सांगूनही तिने आपला हट्ट सोडला नाही. यापूर्वीही तिने घरासमोर येऊन आत्महत्येची धमकी दिली होती, ज्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
मंगळवारी दुपारी पुन्हा या तरुणीने पीडितांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. “मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचे आहे, मी इथून हलणार नाही,” असे म्हणत ती दरवाजापाशी ठाण मांडून बसली. कुटुंबाने तिला बाहेर जाण्यास सांगितले असता तिने बॅगेतील चाकूचा धाक दाखवला. “तुम्ही मला बाहेर काढले तर मी तुमच्यावर वार करीन किंवा स्वतःला इजा करून घेईन,” अशी धमकी देऊन तिने कुटुंबाला बराच वेळ घरातून बाहेर जाण्यास मज्जाव केला. काही वेळाने पुन्हा येण्याची धमकी देऊन ती निघून गेली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.


