अहिल्यानगर -गजराजनगर काळा माथा परिसरात जुन्या वादातून सशस्त्र टोळक्याने एका तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना सोमवारी (21 जुलै) सकाळी 9:30 च्या सुमारास घडली. आकाश राजेंद्र कांबळे (वय 30 रा. गजराजनगर काळा माथा परिसर) असे जखमीचे नाव असून त्यांचा भाऊ अक्षय राजेंद्र कांबळे (वय 28, रा. गजराजनगर काळा माथा परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अटकेतील चौघांना मंगळवारी (22 जुलै) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण मांजरे (रा. साई आनंद लॉनच्या मागे, पोखर्डी, ता. अहिल्यानगर), अक्षय शिरसाठ (रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर), सागर पवार, महेश ऊर्फ अन्नु गुंजाळ, अविनाश काळु डुकरे (तिघे रा.गजराजनगर, काळा माथा परिसर), आकाश अनिल डुकरे (रा. गजराजनगर), रोहन गायकवाड (रा. गजराजनगर) व काही अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश कांबळे हे गजराजनगर फाटा येथील सौदागर फर्निचरजवळ उभे असताना, संशयित आरोपींनी जुना वाद उकरून काढत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. संशयित आरोपींकडे कोयते, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांसारखी घातक शस्त्रे होती. या हल्ल्यात आकाश कांबळे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणार्या चौघांना ताब्यात घेत अटक केली असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक निरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.


