पुणे विभागात अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत सात ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेत ३७ लाख ६१ हजार १०० रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. भेसळीच्या संशयावरून दूध, पनीर, लस्सी, बिस्किटांसह विविध अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, नाशवंत असल्याने मोठ्या प्रमाणातील संशयित दूध नष्ट करण्यात आले आहे. तसेच नियमभंग आढळलेल्या दोन दूध संस्थांना पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते १२ जुलैदरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत पुणे विभागातील विविध ठिकाणी तपासण्या करून लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून ९२ हजार ५४१ किलो व लिटर अन्नसाठा जप्त करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील कुपवाड रोडवरील मालती एजन्सीज येथून पनीर व लस्सीचे नमुने घेऊन १२१ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील बालाजी बेकर्समधून पिस्ता, ऑरेंज, पायनापल आणि मँगो कुकीजचे नमुने घेऊन ८६ किलो साठा जप्त करण्यात आला.pg?w=1024 पुणे जिल्ह्यात अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज (सांगोला) या संस्थेच्या दूधवाहू टँकरमधील २८ हजार ४९८ लिटर दूध भेसळीच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच प्रियदर्शनी दूध संकलन केंद्राच्या टँकरमधील २४ हजार ४९८ लिटर दूधही जप्त करून नष्ट करण्यात आले.
जुन्नर येथील यशोदा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या संस्थेच्या तपासणीत ए-२ गीर गाय दूध आणि गाय दूधाचे नमुने घेण्यात आले. लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरून १ हजार ८०६ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. संबंधित संस्थेला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही देण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजच्या चिलिंग सेंटरवर तपासणीदरम्यान दूध खरेदी-विक्रीच्या नोंदी नसणे, वैध परवाना नसणे तसेच अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे तेथील ३७ हजार ५३२ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले असून संबंधित संस्थेलाही व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.


