नगर शहरात करिअर अकॅडमी चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

अहिल्यानगर -पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणार्‍या एका २१ वर्षीय तरुणीचा अकॅडमी चालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. शिवरक्षक करिअर अकॅडमीचा चालक योद्धा राजे पवार याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील बोरखेड येथील रहिवासी असलेली २१ वर्षीय विद्यार्थिनी अहिल्यानगरमधील शिवरक्षक करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होती. ती याच संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. दरम्यान, १७ जुलै ते ३ सप्टेंबर या कालावधीत संशयित आरोपी योद्धा राजे पवार याने तरुणीला कार्यालयात बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले. त्याने तिच्या अंगावर हात टाकून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. घाबरलेल्या तरुणीने सुरुवातीला नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर ही तक्रार तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी योद्धा पवार याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे करत आहेत.

—————————————————————————-
नेप्तीत पाच हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा
अहिल्यानगर : शहरालगतच्या नेप्ती गावात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. पोलिसांनी एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकत ४१० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि तब्बल ६,५०० लिटर कच्चे रसायन नष्ट केले. या कारवाईत एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, ११ आरोपींविरुद्ध पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर २०२६ रोजी या पथकाने अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेप्ती गावात गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणार्‍यांची माहिती घेतली. त्यानंतर पथकाने पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पोलिसांनी ही सर्व दारू आणि हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन जागीच नष्ट केले. या कारवाईत अजय चांगदेव पवार, सुनिल बाजीराव पवार, दिपक बबन नागपूरे, भारत माणिक पवार आणि शरद माणिक पवार यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सपोनि हरिष भोये, पोउपनि कृष्णकुमार सेदवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles