पाथर्डी तालुक्यातील सोसायटीत आर्थिक घोटाळा;चेअरमनसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी-देव-संतांच्या नावाचा आधार घेत ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या श्रीसंत माऊली अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डीसह चिचोंडी, तिसगाव, तेलकुडगाव, खरवंडी व नेवासा तालुयातील देडगाव शाखांचे व्यवहार अचानक बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. संस्थेचे चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाट यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, सुमारे सहा ते सात कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा गुंतवणूकदारांनी केला आहे. शंभरपेक्षा अधिक गुंतवणूकदार बुधवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.

घाटशिरस येथील भारती अशोक वारे (वय ५९) या अर्धांगवायूने त्रस्त महिलेने संस्थेत पाच लाख रुपये ठेवले होते. २७ व २८ जुलै २०२६ रोजी त्यांनी ही रक्कम जमा केली होती. पैशांची गरज भासल्याने १ सप्टेंबरपासून त्या संस्थेच्या पाथर्डी शाखेत पैसे काढण्यासाठी चकरा मारत होत्या. मात्र, उद्या देतो, कॅश शिल्लक नाही, नंतर देतो अशी कारणे सांगून त्यांना परत पाठविण्यात येत होते.
मंगळवारी त्या पुन्हा शाखेत गेल्यानंतर संस्थेचे व्यवहार बंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चेअरमन सुनील शिरसाट यांचा मोबाईलही बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी भारती वारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाट, व्हाईस चेअरमन बाबासाहेब शिरसाट तसेच संचालक आंबादास आव्हाड, आनंद सानप, शरद मरकड, छाया बोरुडे, आबासाहेब गिरी, नंदा शिरसाट, युवराज मरकड, भरत जाधव व अमोल लोहिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहेत.

दरम्यान, संस्थेच्या विविध शाखांमधील शंभरपेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात येऊन आपापल्या ठेवींची माहिती पोलिसांना दिली. अनेक गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या असून, काहींनी लाखो रुपये तर काहींनी आयुष्यभराची बचत संस्थेत जमा केल्याचे सांगितले. एकट्या एका महिलेचे ६५ हजार रुपये अडकले आहेत. सर्वजण हवालदिल झाले असून, आपले पैसे परत मिळावेत, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या सर्व शाखांमधील व्यवहार बंद आहेत. काही कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांपासून वेतनही झालेले नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी संस्थेच्या विविध शाखांमधील रोकड जमा करण्यात आली होती. तसेच काही संगणक तिसगाव येथे नेण्यात आल्याची माहिती गुंतवणूकदारांनी दिली. संस्थेत गुंतवलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम तसेच सोने तारण ठेवून घेतलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने याबाबतही गुंतवणूकदारांनी गंभीर आरोप केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles