भगवी टोपी, भगवे उपरणं कामी आले ;माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित

अहिल्यानगर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहिल्यानगर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून तनपुरे यांचा ३० मे रोजी भाजप प्रवेश होणार आहे. भाजप पक्ष पदाधिकारी तसेच तनपुरे समर्थकांकडून याला दुजोरा मिळाला आहे. प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी आमदार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. परंतु आता ते भाजपकडून विधानपरिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे तसेच त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ३० मे रोजी ठरल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांचा दूरध्वनी बंद असल्याचे आढळले. प्राजक्ता तनपुरे हे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते माजी खासदार प्राजक्त तनपुरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या आई डॉ. उषा तनपुरे राहुरी पालिकेच्या नगराध्यक्ष होत्या.

नुकतीच विधानसभेच्या राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकी पूर्वीपासून प्राजक्त तनपुरे वेगळी भूमिका स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यांनी भगवी टोपी, भगवे उपरणं असा वेष परिधान करत हे संकेत दिले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी झालेल्या संपर्कातून तनपुरे यांनी पोटनिवडणुकीत उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय सहजसाध्य झाला.मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कातून तनपुरे यांना विधान परिषदेच्या उमेदवारीचा शब्द मिळाल्याची चर्चा होत होती. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. जयंत पाटील यांच्याच भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. तनपुरे यांनी दोन दिवसांपासून त्यांच्या ‘डीपी’वर जयंत पाटील यांना भावनिक साद घालणारे छायाचित्र प्रदर्शित केले होते. त्यातूनही त्यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत मिळत होते.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहिल्यानगर मतदारसंघाची जागापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्याआधारे अजित पवार गटाने महायुतीच्या जागा वाटपात अहिल्यानगरच्या या जागेवर दावा केला. मात्र संख्याबळाच्या आधारावर ही जागा भाजपने मिळवल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles