चार पुलांसाठी १२ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर
खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार महत्त्वपूर्ण पुलांच्या बांधकामांसाठी एकूण १२ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, नगर व पारनेर तालुक्यातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
नगर तालुक्यातील मठ पिंपरी ते डोबळेवस्ती मार्गावरील ९० मीटर लांबीच्या पुलासाठी ४ कोटी ६६ लाख ५३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना वर्षभर सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
पारनेर तालुक्यातील डिकसळ ते जामगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपये मंजूर झाले आहेत. तसेच गरखिंडी ते आळकुटी मार्गावरील दोन पुलांच्या कामांसाठी अनुक्रमे २ कोटी ८४ लाख ७५ हजार आणि २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील ओढे, नाले व पाण्याच्या प्रवाहामुळे विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. अनेकदा नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. पुलांची कामे पूर्ण झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या पुलांचा सर्वाधिक फायदा शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण तसेच दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होऊन बाजारपेठेशी संपर्क वाढणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधांपर्यंत पोहोचणेही सोपे होणार आहे.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची मानली जात आहेत. पुलांमुळे गावागावांतील संपर्क वाढण्याबरोबरच स्थानिक आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळणार आहे.
निधी मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागाने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना लवकर सुरुवात करावी. पुलांची कामे निर्धारित कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा संबंधित गावांतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या चार पुलांच्या मंजुरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळण अधिक सक्षम होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे खासदार निलेश लंके यांच्या वतीने सांगण्यात आले.
मंजूर कामे व निधी
मठ पिंपरी-डोबळेवस्ती, ता. नगर : ९० मीटर पूल : ४ कोटी ६६ लाख ५३ हजार,
डिकसळ-जामगाव, ता. पारनेर : पूल : २ कोटी ६६ लाख ४२ हजार,
गरखिंडी-अळकुटी, ता. पारनेर : पूल : २ कोटी ८४ लाख ७५ हजार,
गरखिंडी-आळकुटी, ता. पारनेर : आणखी एक पूल : २ कोटी १७ लाख १६ हजार
एकूण मंजूर निधी : १२ कोटी ३४ लाख ८६ हजार


