बायकोच्या नावावर ३० लाखांचे कर्ज काढून नवरा पळाला
दुसऱ्या विवाहाचा आधार घेत एका व्यक्तीने पत्नीला आर्थिक जाळ्यात ओढून तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पहिला विवाह मोडीत निघाल्यानंतर ओळखीच्या व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. विवाहानंतर काही दिवसांतच व्यवसायाचे कारण सांगून नवऱ्याने महिलेच्या नावावर विविध बँकांमधून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सोने तारण अशा स्वरूपात सुमारे ३० लाख रुपये उकळलेकाही काळानंतर महिला गरोदर असताना नवऱ्याने किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तो आपल्याच मूळ गावी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या कर्जामुळे पीडित महिलेचे हक्काचे घर गहाण पडले असून, नवऱ्याकडून कोणताही आर्थिक आधार मिळत नसल्यामुळे सध्या महिलेवर आणि तिच्या दोन मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मद्यधुंद कारचालक पिस्तूलस अटक
एका सराईत कारचालकाला पिस्तूल आणि २६ जिवंत काडतुसासह पोलिसांनी जेरबंद केले. तोफखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने डीएसपी चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान कारवाई केली. संशयित सुझुकी ब्रीजा कारने पोलिसांना हुलकावणी देत वेगाने पळ काढला, मात्र पोलीसांनी कारचा पाठलाग करून कोठला बसस्थानक परिसरात वाहन अडवले. यावेळी चालक शरद हरीदास दरंदले (रा. सोनई, नेवासा) मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या कमरेत परवानाधारक पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये ८ जिवंत काडतुसे आढळले. वाहनाच्या अधिक झडतीमध्ये एका बॉक्समध्ये १८ अतिरिक्त जिवंत काडतुसे सापडले. पोलिसांनी एकूण २६ जिवंत काडतुसे आणि शस्त्र जप्त केले. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम आणि मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


