आयुष रुग्णालयास ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष रुग्णालय’ असे नाव ; खा. नीलेश लंके यांचा पुढाकार

डॉ. आंबेडकर आयुष रुग्णालय नामकरणाबाबत केंद्र सरकार अनुकूल

कार्यवाहीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग

खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार

अहिल्यानगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील केंद्र प्रायोजित आयुष रुग्णालयास ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष रुग्णालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार लंके यांच्या प्रस्तावास मंत्री प्रतापराव जाधव यांनी अनुकूलता दर्शवित कार्यवाहीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग केला आहे.

खासदार लंके यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी आयुष मंत्रालयाला सविस्तर पत्र पाठवून या नामकरणामागील सामाजिक व संविधानिक भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रामीण भागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वंचित घटकांसाठी संबंधित आयुष रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समानता व सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अभिवादन म्हणून या रुग्णालयास त्यांचे नाव देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
खासदार लंके यांच्या पत्रास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी पाठविलेल्या उत्तरात या प्रस्तावाची दखल घेतली असून, संबंधित विषय महाराष्ट्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

मंत्री जाधव यांनी स्पष्ट केले की संबंधित रुग्णालय राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत ‘५० खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय’ म्हणून मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नावात राष्ट्रीय आयुष अभियानाचा
संदर्भ असणे आवश्यक आहे. तसेच केंद्र प्रायोजित योजना असली तरी नामकरणाचा अंतिम अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर प्रस्ताव दिनांक १६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, आता या नामकरणाबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. या नामकरणामुळे सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळकटी मिळेल, तसेच वंचित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रस्तावास स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच राज्य सरकार यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles