अहिल्यानगरमध्ये ह्रदय पिळवून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. बायको नांदायला येत नाही म्हणून नवऱ्याने मुलांसह आयुष्य संपवलं आहे. पोटच्या मुलांना विहिरीत ढकलून बापाने स्वत: आत्महत्या केली. राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारातील घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारातील व्यक्तीने मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली. या व्यक्तीने मुलांना विहिरीत ढकलून स्वत:ही आत्महत्या केल्याचं उघड झालं. या व्यक्तीसह दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आहे. आता आणखी बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे.
अरुण काळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ३० वर्षीय अरुण काळे हे श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगावात एक मुलगी आणि तीन मुलांसह राहत होते. अरुण काळे यांचा एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत मृतदेह आढळला. त्यांनी स्वत:चे हात पाय बांधून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवानी अरुण काळे ( वय 8 ) , प्रेम अरुण काळे ( वय 7 ) वीर अरुण काळे ( वय 6 ) , कबीर अरुण काळे ( वय 5 ) अशी मृत मुलांची नावे आहेत. मुले हे शाळेच्या गणवेशात होती. सतत होणाऱ्या वादा -वादीमुळे बायको आठ दिवसांपूर्वी येवला येथे माहेरी गेली होती.
अरुण काळे यांचा विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. विहिरीत मृतदेह पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले.


