मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासनात फेरबदल करताना पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांना नव्या पदावरील नियुक्तीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
राज्य सरकारने ३१ मार्चला प्रशासनात फेरबदल करताना दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्यासह १० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतरच दोनच दिवसात आणकी २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. तर आज आणखी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निर्गमित केले असून पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागात मुंबई यांची राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक (RUSA) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यशदाचे उपसंचालक मंगेश जोशी यांची पर्यटन संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुशल जैन यांची सोलापूरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर रेवैया डोंगरे सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने गेल्या पंधरा दिवसात तब्बल ४० हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र या सर्व बदल्यांमध्ये सर्वाधिक वाद्ग्रस्त बदली तुकाराम मुंढे यांची ठरली आहे. दिव्यांग कल्याण विभागात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या मुंढे यांनी दिव्यांग कल्याणच्या नावाखाली सरकारची निधीची होणारी लूट थांबवितांना अनेक बोगस दिव्यांग कल्याण संस्थांवर कारवाईची बडगा उगारला होता. मुंढे यांच्या या कारवाईने हवादील झालेल्या संस्थाचालकांनी सरकारमधीलच काही मंत्र्यांना हातीशी धरून मुंढे यांची बदली घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.


